भाव माझ्या अंतरीचे...!( पुष्प ४थे) स्त्री: घरकामगार की मालकीण? - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

भाव माझ्या अंतरीचे...!( पुष्प ४थे) स्त्री: घरकामगार की मालकीण?


                🛑भाव माझ्या अंतरीचे...!( पुष्प ४थे)
                 🛑 स्त्री: घरकामगार की मालकीण?
   बाईने असंच वागावं, असंच चालावं, जास्त बोलू नये, इथे जाऊ नये, तिथे जाऊ नये अशी अनेक बंधने स्त्रियांवर लादली गेली. आपल्याकडे पूर्वी पासूनच पितृसत्ताक पद्धत असल्याने स्त्री ही आधी माहेरी आणि नंतर सासरी बंदिस्त राहिली. तिला व्यक्त होता येऊ नये म्हणून अनेक प्रकारची बंधने लादली गेली. ती 
'चूल आणि मूल किंवा रांधा, वाढा आणि उष्टी काढा' यात तिचं संपूर्ण आयुष्य झोकून द्यायला तिला भाग पाडलं गेलं. तिच्यातील "स्वत्व" तिला कळू दिलं गेलं नाही. शोषण, तक्रार, अवहेलना, इजा, दंड, अपमान, अन्याय, सतत दुजाभाव यापेक्षा दुसरं काहीही स्त्रीला मिळालेलं नाही.
   हळूहळू समाजात या विरोधात आवाज उठू लागले. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या आधाराने दडपून टाकलेल्या मातीतून वर येऊ लागली. शिकू लागली. त्याने तिच्यातीली बंडखोरवृत्ती जागृत झाली. तिच्यावर होणाऱ्या अन्यायावर आवाज उठवू लागली. स्त्री लिहू लागली, अभ्यासपूर्णतेने मोकळी होऊ लागली. तेव्हा कुठे स्त्रीही माणूस आहे याची साक्ष समाजाला मिळाली. अन्यथा तिच्यातील कलागुण दबलेलेच राहिले असते.
    आज आधुनिक जगात आपल्याला अनेक स्त्रिया या स्वतंत्र आहेत अशा वाटल्या, तरी वर वर दिसणारं त्यांचं स्वातंत्र्य हे त्यांना बरेचदा काहींना काही गमावून मिळालेलं असतं. कधी घर, कधी नवरा, तर कधी स्वाभिमान. 
    आजही अनेक स्त्रिया अशा आहेत ज्यांना घरातील पुरुषाला विचारल्याशिवाय कोणते निर्णय घेता येत नाहीत. अनेक स्त्रिया या आजही नोकरी आणि घर दोन्ही करत असताना देखील तिच्या भावना किंवा तिला होणारा शारीरिक त्रास किंवा मानसिक त्रास समजून घेतले जात नाही. सगळीच कामे ही जशी स्त्रीने जन्मत:च स्वीकारली आहेत अशा पद्धतीने तिच्यावर लादली जातात.
    रात्रीच्या जेवणानंतर घरात राहून घराचा सांभाळ करणारी स्त्री किंवा नोकरी करून घरी आल्यानंतर सर्व आवरणारी स्त्री ही दिवसाचे चोवीस तास कामात स्वतःला झोकून देते. पण टाइम टू टाइम नोकरी करून घरी परतणारा पुरुष मात्र त्याच्या हातात सर्व गोष्टी मिळाव्यात अशी अपेक्षा करतो. बायकोची निवड करताना आपल्यापेक्षा कमी शिकलेली किंवा कमी उंचीची किंवा कमी पगार घेणारी असावी पण दिसायला सुंदरच हवी असा प्रत्येक पुरुषाचा अट्टहास असतो. प्रत्येक गोष्टीत स्वतःपेक्षा कमी लेखणं किंवा ती कशी आपल्या धाकात राहील, मर्जीत राहील हा विचार कायमच आपल्या समाजात रुजलेला आहे. पण आपल्याच आयुष्यातील स्त्रीला असं दुय्यम समजणारा पुरुष सुद्धा तितकाच दुय्यम असतो. जो आपल्या स्त्रीचा सन्मान करू शकत नाही त्याला समाजात वर वर जरी मान मिळत असला तरी तो लोकांच्या आदरस्थानी नसतो. त्या ऐवजी आपल्याकडे असे अनेक थोर पुरुष होऊन गेले ज्यांनी आपल्या पत्नींना सन्मानाची वागणूक दिली ते लोकांच्याही आदरस्थानी राहिले. कारण मुळात आपल्या स्त्रीकडे एक माणूस म्हणून पाहण्याची निखळ दृष्टी त्यांच्याकडे होती. यात छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो कर्वे, बाबा आमटे, अभय बंग असे अनेक लोक आहेत ज्यांच्या विषयी स्त्रियांच्याही मनात नितांत आदर होता. पण स्त्रियांचा अनादर करणारे किंवा त्यांना दुय्यम लेखणारे आपल्या आयुष्यात सुद्धा फार काही करत नाहीत. 
     तेही तितकेच दुय्यम असतात.
एवढे महापुरुष आपल्या समाजात होऊनही आणि त्यांनी स्त्री सन्मानाचे दाखले प्रस्थापित करून समाज त्यांच्या विचारांना फक्त त्यांच्या फोटोतच ठेवतो. कधी कुठली स्त्री गरोदर असल्यास बरेचदा ‘पहिला मुलगा होऊ दे रे देवा’ अशी अपेक्षा प्रत्येक स्त्रीकडून केली जाते. पहिला मुलगा झाला तर त्या स्त्रीचं जीवन सार्थकी लागलं असली मुक्ताफळे उधळली जातात. म्हणजे मुलगी झाली तर ती मुलाची जागा घेणार नाही किंवा मुलगी म्हणजे परक्याचं धन हाच समज अजूनही कायम आहे.
     स्त्रीच्या जन्मापासूनच तिला सहनशक्तीची एक अद्भुत देणगी मिळते. तेव्हाच ती या सगळ्यातून स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करते. स्त्री किंवा पुरुष या दोघांमध्ये भेदाभेद न करता दोघांनी जर मिळून अनेक गोष्टी एकत्र केल्या तर त्या सारखं सुंदर काही नसेल. केवळ एक व्यक्ती आपल्या ताटाखालचं मांजर व्हावं अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. स्त्री किंवा पुरुष या दोघांमधल्या कुठल्याही एकाचा तिरस्कार करणं हे देखील समाजाच्या उन्नतीसाठी घातक ठरेल. जोपर्यंत आपण आपले विचार बदलत नाही तोपर्यंत कोण प्रथम कोण दुय्यम हा भेद होत राहील. यासाठी दोघांनीही एकमेकांना तितकाच आदर आणि सन्मानपूर्वक वागणूक देणं गरजेचं आहे.
 ✒️प्रा. अभिजीत भंडारे
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads