जिल्ह्यात 25 जून ते 1 जुलै दरम्यान कृषी संजीवनी मोहीम - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

जिल्ह्यात 25 जून ते 1 जुलै दरम्यान कृषी संजीवनी मोहीम


समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर,दि. 24  : राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, तो समृध्द व्हावा यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत 25 जून ते 1 जुलै 2022 या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताह आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली.

            कृषि संजीवनी मोहिमेची सांगता माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी 1 जुलै 2022 कृषदिन साजरा करून होणार आहे. कृषि संजीवनी सप्ताहामध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्र यांचे शास्त्रज्ञ, लोकप्रतिनिधी व रिसोर्स बॅंक शेतकरी या सगळ्यांच्या सहभागातून गावपातळीवर शेतकऱ्यांना जागरूक व प्रशिक्षित केले जाणार आहे.

            कार्यक्रमाचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे. 25 जून रोजी विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार, मूल्यसाखळी बळकटीकरण दिनाअंतर्गत कडधान्य तंत्रज्ञान प्रसार वाण/बियाणे निवड, बीजप्रक्रिया, महाडीबीटी, बीबीएफ़वर लागवड तंत्रज्ञान याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात येईल. 26 जूनला पौष्टिक तृणधान्य दिवस अंतर्गत पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व, लागवड तंत्रज्ञान प्रक्रिया व मूल्यवर्धन याबाबतीत माहिती देण्यात येणार आहे. 27 जूनला महिला कृषि तंत्रज्ञान सक्षमीकरण दिवस अंतर्गत कृषि क्षेत्रातील महिलांचे चर्चासत्र, परिसंवाद, व्याख्यानमाला, कौशल्यविकास आधारित प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. 28जूनला खत बचत दिन अंतर्गत खतांचे संतुलित व कार्यक्षम वापर यासाठी मृद व पाणी तपासणी, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर, कृषिक अॅपची माहिती जैविक खतांचे महत्व, पिकांची खत मात्रा बनवणे, खत वापरताना घ्यावयाची काळजी व खतांच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम या संदर्भातील कार्यक्रमांद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

29 जूनला प्रगतशील शेतकरी संवाद दिवस अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील रिसोर्स बॅंकमधील शेतकरी इतर शेतकऱ्यांशी संवाद साधतील व त्यांनी राबविलेले नाविण्यपूर्ण तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन, 30 जूनला शेतीपूरक व्यवसाय तंत्रज्ञान दिवस अंतर्गत शेती व्यवसायास पूरक जोडधंदा म्हणून फलोत्पादन संरक्षित शेती भाजीपाला लागवड, दुग्धव्यवसाय, शेततळ्यातील मत्स्यपालन, मधुमक्षिका पालन यासाठी असणाऱ्या कृषि विभागातील विविध योजनाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे

 जुलै 2022 रोजी कृषि दिन व कृषि संजीवनी सप्ताहाची सांगता होणार आहे. कृषि संजीवनी सप्ताहामध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे.


Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads