वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांच्या गाडीने पोलिसाला चिरडले ; पोलिस जागीच ठार - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांच्या गाडीने पोलिसाला चिरडले ; पोलिस जागीच ठार




समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील शिरसी येथे चोरीची वाळू वाहतूक करणाऱ्या माफियावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर वाहन घालून त्यांना चिरडून ठार मारण्याची संतापजनक घटना घडली आहे. पोलिस हवालदार गणेश प्रभू सोनलकर (वय 32, मंगळवेढा पोलिस ठाणे) असे वाळू तस्कराच्या वाहनाखाली मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. 
शिरसी गावच्या हद्दीतून चोरट्या वाळूची वाहतूक होणार असल्याची माहिती समजल्यानंतर सोनलकर हे त्या ठिकाणी पोचले होते. गोणेवाडी ते शिरसी या गावादरम्यान वाळू वाहतूक करणाऱ्या विना क्रमांकाच्या भरधाव पिकपला त्यांनी सकाळी नऊच्यादरम्यान शिरसी गावाजवळ हॅटसन डेअरीजवळील वेताळ मंदिरासमोर थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने भरधाव वाहन सोनलकर यांच्या अंगावर घातले. त्यात ते गंभीर जखमी झाले. जखमी सोनलकर यांना 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून मंगळवेढा येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी त्यांचा मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाला नंबरप्लेट नाही, त्यामध्ये दोघेजण होते, त्यामधील एकजण पळून गेला असून एकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
घटनेची फिर्याद गोणेवाडीचे पोलिस पाटील संजय मेटकरी यांनी दिली आहे. त्यानुसार गाडीचा मालक, चालक आणि त्याचा साथीदार अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तीनही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मंगळवेढ्याचे सहायक पोलिस निरीक्षक बी. बी. पिंगळे यांनी दिली. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे

Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads