पिकविमा योजनेच्या लाभापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या -कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे आदेश - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

पिकविमा योजनेच्या लाभापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या -कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे आदेश



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
पंढरपूर, दि. (25):-  जिल्ह्यात पावसाने मोठ्या प्रमाणात पिकांचे  नुकसान झाले आहे.  पीक विम्याबाबत  योग्य पद्धतीने कार्यवाही करून एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी,  असे आदेश राज्याचे  कृषिमंत्री दादाजी  भुसे यांनी आज येथे दिले .

सांगोला तालुक्यातील अजनाळे  येथे सोलापूर जिल्ह्यातील रिसोर्स फार्मर्स आणि  पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांच्यासोबत झालेल्या परिसंवादात ते बोलत होते.  यावेळी आमदार शहाजी पाटील, पंचायत समिती सभापती राणीताई कोळवले, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, प्रबुद्धचंद्र झपके, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, तहसीलदार अभिजीत पाटील, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी सर्जेराव तळेकर, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र पवार, शिवाजी शिंदे, संभाजी शिंदे ,भाऊसाहेब रुपनर आदी उपस्थित होते.

  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने फळ पीक  विम्याची रक्कम देण्याबाबत विमा कंपन्यांनी कार्यवाही करावी. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. नुकसानग्रस्त एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही आदेश  श्री . भुसे यांनी  यावेळी दिले . 

अतिवृष्टी आणि  गारपिटीमुळे द्राक्ष बागांचे नुकसान होऊ नये यासाठी कृषी विद्यापीठाला अभ्यास करण्याची जबाबदारी दिली जाईल. यावर शास्त्रीय आणि  तांत्रिक पद्धतीने अभ्यास करून सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. तसेच सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात डाळिंब उत्पादन घेतले जाते. डाळिंब पिकावर तेल्या, मर आणि  कुजवा या रोगामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त  पिकांची डाळिंब संशोधन केंद्राने पाहणी करावी. यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, यासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असेही आश्वासन कृषी मंत्री श्री .भुसे यांनी  यावेळी दिले .

सांगोला तालुक्यातील अतिवृष्टी आणि  तेल्या रोगामुळे नुकसान झालेल्या पिकांची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी आमदार शहाजी पाटील  यांनी केली. तर सांगोला येथे मध्यवर्ती प्रयोगशाळा व्हावी अशी मागणी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी केली.  यावेळी पीक स्पर्धा विजेते शेतकऱ्यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

तत्पूर्वी कृषिमंत्री श्री . भुसे  यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेत पिकांची पाहणी केली आणि  शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बामणी येथील शेतकरी सदाशिव साळुंखे यांच्या ड्रॅगन फ्रुट पिकाची पाहणी केली. तर यलमार मंगेवाडी येथे राजेंद्र यलपले यांच्या द्राक्ष बागेची पाहणी केली. तसेच अजनाळे येथील तेल्या, मर आणि कुजवा या रोगामुळे नुकसान झालेल्या डाळिंब पिकाची पाहणी करून याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
           
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads